औरंगाबाद – शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसमधून चार ते पाच मुले रस्त्यावर पडल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कूलबसची मागील काच फुटून त्यातून विद्यार्थी रस्त्यावर पडल्याची घटना नगर नाका येथे घडली. या अपघातात एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यासह पाच विद्यार्थ्यांवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस एका शाळेची होती आणि त्यात विद्यार्थी दुसऱ्या शाळेचे होते. यामुळे मोठा गोंधळ उडाला. बसमध्ये क्षमतेेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचीही माहिती आहेे.
कुठे पडले विद्यार्थी
रांजणगाव वाळूज येथून शिवाजी हायस्कूलच्या
विद्यार्थ्यांना शहरात घेऊन येणाऱ्या बसची नगरनाका परिसरात काच फुटली. मागील
बाजूची काच फुटून त्यातून चार ते पाच विद्यार्थी रस्त्यावर पडले. एकाचा पाय
फ्रॅक्चर असून एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याचा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला
डॉक्टरांनी दिला आहे.
बस एका शाळेची, विद्यार्थी दुसऱ्या शाळेचे
शांताई प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय
बजाजनगर या शाळेच्या बसमधून रांजणगाव येथील शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी औरंगाबाद
शहरात येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी हायस्कूलची बस नादुरुस्त
असल्यामुळे त्यांनी संदीप काजळे यांची बस घेतली आणि ते विद्यार्थ्यांना घेऊन
औरंगाबादला येत होते. वाळूज-औरंगाबाद या कायम रहदारीच्या रस्त्यावर नगरनाका येथे
अचानक बसची मागली काच फुटली आणि त्यातून चार-पाच विद्यार्थी खाली पडले. सुदैवाने
त्यावेळी मागून एकही वाहन येत नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक नॉट रिचेबल
शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा अपघात
झाल्यानंतर बसचे मालक संदीप काजळे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत जखमी
विद्यार्थ्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही मुलांना किरकोळ
मार लागला आहे तर एकाच्या डोक्याला मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या
पालकांनी घाटीत गर्दी केली असून सर्वांनी मुख्यध्यापक अनिलकुमार घारुळे कुठे आहेत
याची विचारणा केली. मुख्याध्यापक घारुळे हे पुण्याला असल्याचे सांगण्यात आले असून
त्यांचा फोन स्विचऑप आहे. गोवर आणि रुबेला
लसीकरणासाठी या विद्यार्थ्यांना नेले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र
त्याबाबत खात्रीने कोणीही काही सांगत नाही. या प्रकरणी छावणी पोलिस अधिक तपास करत
आहेत.












